
24 तासांत 300 मिमी पाऊस; घाटघर-रतनवाडीत ढगफुटीसदृश परिस्थिती
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
अहिल्यानगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध भंडारदरा धरण परिसरात गेल्या 24 तासांत पावसाने अक्षरशः तांडव घातले असून, येथे तब्बल 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील घाटघर आणि रतनवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने स्थानिक नदी-नाल्यांना पूर आला आहे.
घाटघर आणि रतनवाडी परिसरातील अतिवृष्टीमुळे या दुर्गम आदिवासी भागातील जनजीवन पूर्णपणे प्रभावित झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून चोख खबरदारी घेतली जात आहे.
पावसाचा वाढता जोर पाहता भंडारदरा धरण परिसरातील सर्व धोकादायक पर्यटनस्थळे तात्काळ बंद करण्यात आली आहेत. कळसूबाई शिखर, ट्रेकर्सचे नंदनवन मानली जाणारी सांदन व्हॅली, रतनवाडी आणि परिसरातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर पर्यटकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच, ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांच्या खाली जाण्यास प्रशासनाने पर्यटकांना सक्त मनाई केली आहे.
दुसरीकडे, नाशिक जिल्ह्यातही मान्सूनचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक 200 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इतर तालुक्यांमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सतत होत असलेल्या या मुसळधार पावसामुळे नाशिक आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचे संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष असून, नागरिकांना आणि पर्यटकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आभाळ फाटल्यासारखा पाऊस
पडणारा भोवरा अकोलेच्या दिशेने
हवामान खात्याने सोमवारी नाशिकमध्ये एका दिवसात 350 मिलीमीटर म्हणजे ढगफुटीसदृश पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. काल रात्रभर नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी पावसाने नाशिक शहराच्या परिसरात विश्रांती घेतली असली तरी त्र्यंबकेश्वर, कसारा आणि इगतपुरी या परिसरात सध्या प्रचंड पाऊस पडत आहे. हवामान खात्याने पालघरमध्ये मोठ्याप्रमाणावर पावसाला कारणीभूत असणारा भोवरा मंगळवारी नाशिक परिसरात सरकेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, आता भोवरा वेगळ्याच दिशेने सरकत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरच्या अकोलेच्या दिशेने सरकत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्यानं नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुळा धरणात 29 हजार 533 क्सुसेकने आवक
पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीत विसर्ग वाढविला आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता दौंड पूल येथे भीमा नदीत 1 लाख 60 हजार 36 क्सुसेकने विसर्ग सुरू होता. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नांदूर मधमेश्वर धरणातून दुपारी एक वाजता गोदावरी नदीपात्रात 7 हजार 924 क्सुसेकने विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय मुळा नदीच्या उगमस्थानी सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा धरणात दुपारी बारा वाजता 29 हजार 533 क्युसेकने आवक होत असल्याने धरणाचा पाणीसाठा 7457 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.
जिल्ह्यात दमदार पाऊस
जिल्ह्यात सोमवारी पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून जिल्ह्यात 26.8 मिलीमिटर सरासरी पाऊस झाल्याची नोंद आहे. अहिल्यानगर 20.9, पारनेर 34.3, श्रीगोंदा 40.5, कर्जत 39.4, जामखेड 21, शेवगाव 10.9, पाथर्डी 9, नेवासा 13.6, राहुरी 5.8, संगमनेर 20.1, अकोले 61.5, कोपरगाव 31.9, श्रीरामपूर 21, राहाता 42.5 मिलीमिटर पाऊस झाला.
अतिवृष्टीचा इशारा: अकोल्यातील शाळांना सुट्टी
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना मंगळवार, दि. 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांनी याबाबतचे आदेश दिले. भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दि. 7 जुलै रोजी अकोले तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये आधीच अतिवृष्टी झालेली आहे. ही स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 25 अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून अकोले तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक व माध्यमिक शाळांना दि. 7 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सुट्टीच्या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी नेहमीच्या कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनासंबंधीचे कामकाज करावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाकी तलाव ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
भंडारदरा पावसाचा जोर वाढल्याने आज कृष्णावती नदीवरील 112 दलघफू क्षमतेचे निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाकी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले. या जलाशयातून ओव्हर फ्लोचे पाणी प्रवरा नदीपात्रातून ओसंडून वाहू लागले. यामुळे यापुढील काळात निळवंडे धरण जलदगतीने भरण्यास मदत होईल. मंगळवारी सकाळी भंडारदऱ्याचा पाणीसाठा 5046 दलघफूटवर पोहचला. तर निळवंडे धरणाचा 1839 द. ल.घ.फू पाणी साठा झाला होता.
अकोले तालुक्यातील प्रवरा व मुळा नदी खोऱ्यांच्या उगमापासून ओढे नाले आता भरून वाहत आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा धबधब्यांनी सजल्या. सर्वप्रथम मुळा नदीवरील 193 दलघफू क्षमतेचा अंबित लघुपाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरला. निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील प्रवरा नदीची उपनदी असलेल्या कृष्णावती नदीवरील 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओव्हरफ्लो झाला. याचा अनुकूल परिणाम निळवंडे धरणातील पाणीसाठा वाढण्यास होणार आहे. सोमवार पावसाची जोरदार बॅटींग झाली. असाच पाऊस जर टिकून राहिला तर भात अवणी लवकर सुरुवात होऊ शकते.भंडारदरा धरणाचा आजचा पाणी साठा 5046 दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. तर रतनवाडी 113, पांजरे 86, भंडारदरा 72, घाटघर 140, वाकी 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अहिल्यानगर/प्रशांत बाफना – भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता वर्तवत रेड अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अहिल्यानगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. धरणातील पाणीसाठा व नदीपात्रातील पाण्याचा आवक लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता व्यक्त केली असून त्यानुसार रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धरणस्थळांच्या खालील प्रवरा नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
अतिवृष्टीमुळे दोन प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी व नाल्यांवरील पाणीपातळीत वाढ झाली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने पेडगाव – शेडगाव मार्ग व आव पुनर्वसन- अजनुज मार्ग हे दोन प्रमुख रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. निमगाव खलू – कौठा – अजनुज – पेडगाव – शेडगाव येथील सरस्वती नदीवरील पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पेडगाव ते शेडगाव मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कौठा – अनगरे – आव – अजनुज – श्रीगोंदा येथील पाईप मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे आव पुनर्वसन ते अजनुज मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.नागरिकांनी पर्यायी सुरक्षित मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
सातारा : राज्यात मराठवाडा वगळता विविध विभागात जोरदार पाऊस सुरू असून मुंबई, उपनगरात पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत असून सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यावर पावसाने अक्षरशः कहर केला असून महाबळेश्वरमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 513 मिलिमीटर म्हणजेच 20 इंच इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा पाऊस शतकातील सर्वाधिक पावसांपैकी एक मानला जात आहे.
यंदाच्या गेल्या 24 तासातील पावसाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगरी भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले असून, ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. अनेक रस्ते खचले, झाडे उन्मळून पडली, वीजपुरवठा खंडित झाला आणि अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ग्रामीण भागातील घाटरस्त्यांवर मातीचे ढिगारे आणि मोठमोठे दगड आल्यामुळे काही गावांचे संपर्क तुटले आहेत. त्यामुळे, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरमध्ये झालेली 513 मिलिमीटर पावसाची नोंद ही सातारा जिल्ह्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाच्या नोंदींपैकी एक ठरली असून, निसर्गाने आपल्या रौद्ररूपाचे दर्शन घडवले आहे.
दरम्यान, या विक्रमी पावसामुळे प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. एकीकडे महाबळेश्वर मधील धबधबे, वेण्णा लेक, तलाव दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसरीकडे हा मुसळधार पाऊस नागरिकांसाठी मोठे संकट ठरत आहे. महाबळेश्वरसह सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागाला या पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अजून काही काळ लागण्याची शक्यता आहे.
अतिट गावात ढगफुटीसदृश्य पाऊस
खंडाळा तालुक्यातील अतिट गावात रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोंगरातून आलेल्या पाण्यामुळे ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे, या पुराचे पाणी अतिट गावातील मंदिर परिसरात आल्यामुळे भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. यावेळी पूर आलेल्या ओढ्या काठच्या काही घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने नुकसानीचे पंचनामे करून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे
राज्यात पावसाचा हाहाकार सुरूच, नाशिक- पुण्यासह ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाण्यासह अनेक शहरांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे आज राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज देखील महत्वाचा असणार आहे. हवामान खात्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही पावसाचा अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर नाशिकसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून केले जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर, कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच, ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
पुण्याला आज सुद्धा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. पुणे शहरासह पिंपरी -चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. पुण्यात ६ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. चिंचवड: १३२ मिमी, लोहगाव: ९८ मिमी, पाषाण: ६९ मिमी आणि शिवाजीनगरमध्ये ५५ मिमी पावसाची नोंद झाली.
नाशिक शहरासह जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आज अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नाशिक शहरासह त्रंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, इगतपुरीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात करण्यात आले आहे. एसडीआरएफचे पथक देखील नाशिकमध्ये तैनात करण्यात आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.. काल रात्रीपासून जिह्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. मात्र वरुणराजाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तर पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली







