
पुणे / प्रशांत बाफना
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर काहीकाळ गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं आहे. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र येथील आठ मतपेट्यांना सील नसल्याचा दावा करत महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षदा देशमुख यांनी आक्षेप घेतला आहे.
प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्या वेळी आठ मतपेट्यांना आवश्यक असलेले निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दावा केला.
विनासील मतपेट्या आढळल्याचे समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असलेल्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलिंग एजंट्सनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या मतपेट्या केंद्रात कशा आल्या, असा थेट सवाल केला. या गोंधळामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.
दरम्यान, आज (ता 27) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. विधान परिषदेची निवडणूक पसंतीक्रमानुसार होत असल्याने मतमोजणीच्या अनेक फेऱ्या होतील. त्यामुळे उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा जाधव यांच्यात सामना आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाकौस्तुभ गावडे, सचिन सानप, जयंत आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यात लढत आहे







