
जळगाव प्रतिनिधी शेख जावीद पाचोरा शहरातील औदुंबर पार्क, सारोळा रोड परिसरात झोक्यात (पाळण्यात) गळफास लागून एका एक वर्षाच्या निरागस बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दि. ३१ रोजी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास घडली.संघर्ष राहुल बागले (वय १ वर्ष) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल बापूराव बागले हे बीएसएफमध्ये सेवेत असून, मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते सकाळी आई-वडीलांनी बाळाला झोक्यात झोपवून शहरात एका खासगी कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, झोक्यात झोपलेल्या बाळाला झोक्याचा फास लागल्याचे घरातील लहान वहिनीच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने बालकाला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.अवघ्या एक वर्षाच्या चिमुकल्याचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने बागले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.







