
पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयाभोवती अस्वच्छतेचा विळखा; डासांसह सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्तसंचार
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
नागरिकांना आरोग्यसेवा देणाऱ्या उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांच्या परिसरातच अस्वच्छतेने गंभीर रूप धारण केले आहे. आवारात वाढलेली झाडे-झुडपे, ठिकठिकाणी साचलेले पावसाचे पाणी आणि दुर्लक्षित परिसरामुळे रुग्णालयाभोवती जणू घनदाट जंगल तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे डासांसह विविध कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार वाढला असून, उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात रुग्णालय परिसरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे. त्यातच वाढलेली झाडी आणि गवत यामुळे डासांची पैदास होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळनंतर या भागात डासांचा उपद्रव अधिक जाणवत असल्याने रुग्णांना उपचार घेत असतानाच डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.
रुग्णालय परिसरातील ही परिस्थिती केवळ अस्वच्छतेपुरती मर्यादित नसून सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण करणारी आहे. दाट झाडाझुडपांमध्ये सरपटणारे प्राणी, विविध प्रकारचे कीटक यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना परिसरातून ये-जा करताना सतर्क राहावे लागत आहे.
विशेष म्हणजे, रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवास वसाहतीची अवस्था त्याहून गंभीर आहे. अनेक ठिकाणी खोल्यांची अवस्था अक्षरशः शेवटची घटका मोजत असल्यासारखी झाली आहे. भिंती, परिसर आणि इमारतींच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. असे असतानाही काही कर्मचारी व त्यांची कुटुंबे या निवासस्थानांमध्ये वास्तव्यास आहेत. वसाहतीभोवती वाढलेली झाडी, गवत आणि साचलेले पाणी यामुळे डास, कीटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या वेळी या भागात निर्माण होणारे वातावरण भयावह वाटत असून, कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाच अशा वातावरणात राहावे लागत असल्याने विभागाच्या परिसर व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांना पाणी साचू न देणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डासांची उत्पत्ती रोखणे याबाबत आरोग्य विभागाकडून सातत्याने आवाहन केले जाते. मात्र, आरोग्याचा संदेश देणाऱ्या रुग्णालयांच्या आवारातच अशी परिस्थिती असेल, तर नागरिकांनी नेमका आदर्श कोणाकडून घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालय परिसरातील झाडे-झुडपे तातडीने हटवून संपूर्ण आवाराची स्वच्छता करावी, साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करावा, डास प्रतिबंधक उपाययोजना राबवाव्यात तसेच कर्मचारी वसाहतीतील धोकादायक आणि जीर्ण खोल्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी, अशी मागणी होत आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. रुग्णालय हे आजारांपासून दिलासा मिळवून देणारे ठिकाण असताना त्याच परिसरात अस्वच्छता, डासांचा उपद्रव आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे.
प्रशासनाने स्वच्छता, वसाहतीची दुरुस्ती करावी
रुग्णालयाच्या आवारातच घनदाट जंगलासारखी परिस्थिती निर्माण झाली असून रुग्णांसह कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीर्ण झालेल्या कर्मचारी वसाहतीतील काही खोल्यांमध्ये आजही कुटुंबे राहत आहेत. प्रशासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून स्वच्छता, फवारणी आणि वसाहतीच्या दुरुस्तीची तातडीने कार्यवाही करावी.
– देविदास पवार, नगरसेवक






