
मौल्यवान धातूंच्या पावडरीचा अवैध व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; दोघे ताब्यात, ३ कन्व्हर्टर व ५ ते ६ किलो पावडर जप्त
जळगाव प्रतिनिधी : शेख जावीद
पारोळा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर म्हसवे गावाजवळ पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी करताना ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरशी संबंधित चोरीचे रॅकेट उघडकीस आले आहे. पोलिसांनी संशयावरून मारुती सुझुकी वॅगनार (क्र. DL-3-CBU-3358) अडवून तपासणी केली असता वाहनातून तीन जुने कॅटॅलिटिक कन्व्हर्टर तसेच अंदाजे ५ ते ६ किलो ‘सायलेंसर माती’ अथवा कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमधील पावडर आढळून आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत आसीफ यामीन (वय २२, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) आणि आरीफ सलीम (वय २३, रा. अलीगड, उत्तर प्रदेश) हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
ईको वाहनांच्या कन्व्हर्टरवर संशयितांचे लक्ष
प्राथमिक चौकशीत मारुती सुझुकी ईको वाहनांच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरची चोरी करून त्यातील मौल्यवान घटकांची विक्री अथवा अवैध व्यापार केला जात असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणातील संपूर्ण साखळीचा तपास सध्या सुरू आहे.
कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या आतील भागात Honeycomb स्वरूपाची रचना असते. त्यावर प्लॅटिनम, पॅलेडियम आणि रोडिअम यांसारख्या मौल्यवान धातूंचे घटक वापरले जातात. या धातूंना बाजारात मोठी किंमत असल्याने जुन्या वाहनांच्या कन्व्हर्टरची चोरी करून त्यातील घटकांचा गैरव्यवहार केला जात असल्याचे तपासातून समोर येत आहे.
‘ईको’च का ठरली चोरट्यांची पसंती?
प्राथमिक तपासानुसार संशयितांकडून विशेषतः मारुती सुझुकी ईको वाहनांना लक्ष्य केले जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. वाहनाची तुलनेने अधिक ग्राउंड क्लीअरन्स असल्यामुळे वाहनाखाली सहज जाता येते आणि कन्व्हर्टर काढण्यासाठी कमी वेळ लागतो, अशी शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई-ठाण्यातील चोऱ्यांचीही पडताळणी
संशयितांनी मुंबई आणि ठाणे परिसरात अशाच स्वरूपाच्या चोऱ्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांमधील दाखल गुन्ह्यांची माहिती तपासली जात आहे. त्यामुळे या प्रकरणामागे मोठे नेटवर्क आहे का, याकडे पोलिसांचे लक्ष लागले आहे.
नाकाबंदी ठरली निर्णायक
महामार्गावर सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये संशयास्पद वाहनाची बारकाईने तपासणी केल्यामुळे हा तुलनेने वेगळ्या प्रकारचा चोरीचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. पारोळा पोलीस ठाणे आणि महामार्ग पोलीस केंद्र, पाळधी यांच्या संयुक्त कारवाईमुळे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरीच्या संभाव्य नेटवर्काचा तपास करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुढे माल कुठे जात होता?
जप्त केलेले कन्व्हर्टर आणि पावडर नेमकी कोणाकडे विकली जात होती? या व्यवहारामागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी आहे? चोरीच्या कन्व्हर्टरमधून मिळणाऱ्या मौल्यवान धातूंची पुढे विल्हेवाट कशी लावली जात होती? या सर्व बाबींचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
सदर प्रकरणात संशयित आणि जप्त मुद्देमालाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार BNS कलम 303, 317(2), 317(4), 317(5), 324(4), 324(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 आणि 199A अन्वये कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती आहे.







