
अहिल्यानगर ।प्रशांत बाफना
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी शिवारातील रुद्रा नदीच्या पात्रातून विनापरवाना वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. 12) कारवाई केली आहे. या कारवाईत जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टर आणि वाळूसह एकूण 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून एका डंपरमालकाचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले होते. यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्यासह पोलीस अंमलदारांचे पथक तयार केले होते. हे पथक पाथर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असताना हनुमान टाकळी शिवारातील रुद्रा नदीच्या पात्रातून जेसीबीच्या साहाय्याने डंपरमध्ये वाळू भरून वाहतूक केली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी रस्त्यावर वाळूने भरलेला एक डंपर आढळला. त्याची तपासणी केली असता वाहतुकीचा परवाना नसल्याचे समोर आले. त्यानंतर नदीपात्रात पाहणी केली असता जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर आणि डंपरमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळले.
या कारवाईत वैभव बंडू डांगे (वय 22, रा. डांगेवाडी, ता. पाथर्डी), ऋषीकेश अंकुश मोरे (वय 28), बंडू शिवाजी बर्डे (वय 45), सोमनाथ जगन्नाथ डांगे (वय 28) आणि प्रविण उत्तम शिरसाठ (वय 29, सर्व रा. हनुमान टाकळी परिसर, ता. पाथर्डी) यांना ताब्यात घेण्यात आले. सतीश एडके (पूर्ण नाव माहीत नाही, रा. पाथर्डी-शेवगाव रोड) हा डंपरमालक फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी या कारवाईत 15 लाख 5 हजार रुपये किमतीचा डंपर व वाळू, 25 लाख रुपये किमतीचा जेसीबी, 15 लाख 20 हजार रुपये किमतीचा दुसरा डंपर व वाळू आणि 5 लाख 5 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व वाळू असा एकूण 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली







