
तालुका प्रतिनिधी : राहुल जयकर
यावल : यावल पोलीस ठाण्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाप्रमुख शमीभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू करण्यात आलेले धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्थगित करण्यात आले.
यावल तालुक्यातील किनगाव येथे २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९०/२०२६ मधील आरोपींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते.
या आंदोलनाला भीम आर्मी, ऑल इंडिया पँथर सेना, एमआयएम , कौमी एकता फाऊंडेशन तसेच इतर विविध सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला होता.
यावल पोलीस प्रशासनाने जावक क्रमांक २७४०/२०२६ अन्वये दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाप्रमुख शमीभा पाटील यांना लेखी पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार, किनगाव घटनेतील गुन्हा क्रमांक ३९०/२०२६ मधील आरोपींचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग आहे किंवा नाही, याची सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे पडताळणी करण्यात येणार आहे.
तक्रारदारांनी निवडलेल्या पाच सदस्यीय पंच मंडळाच्या समक्ष आरोपींच्या सहभागाबाबत पडताळणी केली जाणार असून, सहभाग निश्चित झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच एफआयआरमध्ये नमूद नसलेल्या इतर ३० ते ४० व्यक्तींच्या सहभागाबाबतही तपासणी केली जाणार असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींबाबत विहित कालावधीत चौकशी पूर्ण करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसंदर्भात संपूर्ण चौकशी करून विविध न्यायालयीन निकालांचे अवलोकन करण्यात येईल. फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल. तसेच १५ दिवसांच्या आत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
याशिवाय किनगाव व परिसरात कोणीही प्रक्षोभक वक्तव्य करू नये आणि गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; आता पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष
पोलीस प्रशासनाकडून लेखी आश्वासन प्राप्त झाल्यानंतर जिल्हाप्रमुख शमीभा पाटील यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व आंदोलनकर्त्यांनी ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, आंदोलन स्थगित झाले असले तरी पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार १५ दिवसांच्या आत प्रत्यक्षात कोणती कार्यवाही होते, आरोपींच्या सहभागाची पडताळणी कशी केली जाते आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधातील तक्रारीवर चौकशीनंतर कायदेशीरदृष्ट्या काय निर्णय घेतला जातो, याकडे आता आंदोलकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.







