
असे कोण आहेत धर्मेंद्र प्रधान की एवढा प्रचंड वाद होऊनही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. नीट पेपरफुटीप्रकरणात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी देशभर आंदोलन सुरु आहे. दिल्लीत आक्रमक तरुणाई थेट संसदेवर धडकली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीच्या आंदोलनापाठोपाठ आता ‘इंडिया’ आघाडीने देखील आंदोलन सुरु केले आहे. देशभरातून धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी होत असताना सरकारने अद्याप यावर कोणेतही भाष्य केले नाही. धर्मेंद्र प्रधान असे आहेत करी कोण ? प्रचंड वाद होऊनही त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागे भाजपची नेमकी रणनीती तरी काय असावी? अर्थात धर्मेंद्र प्रधान म्हणजे चिंतामणराव देशमुख नाही व लालबहादूर शास्त्री तर मुळीच नाही, हे समजून घ्यावे लागेल!
धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटचे विश्वासू मानले जातात. बारा वर्षांपासून ते मोदींच्या मंत्रीमंडळात टीकून आहेत. असं म्हणतात की, ते भाजपमधील सर्वात पावरफुल नेते आहेत. देशभरातील संघ परिवार, विद्यार्थी संघटना आणि भाजपच्या संघटनात्मक कार्यकारिणीवर त्यांची भक्कम पकड आहे. त्यामुळे स्थानिक पातळीपासून दिल्लीपर्यंत दबदबा असलेल्या या नेत्याचा राजीनामा घेणे भाजपला शक्य नाही असे म्हटले जाते. त्यामुळे भाजपला नक्की ‘धर्म’ वाचवायचा आहे की ‘धर्मेंद्र’ला वाचवायचे आहे? आज देशातील युवक रस्त्यावर उतरून प्रश्न विचारत असतील, तर त्यांची दखल घेणे ही सरकारची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचा आवाज हा राजकारणाचा नाही, तर भविष्याचा आवाज असतो. तो ऐकला गेला नाही तर त्याचे दूरगामी परिणाम देशालाच भोगावे लागतील.
धर्मेंद्र प्रधान यांची मुले अमेरिकेत शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना या विद्यार्थ्यांच्या व्यथांची यत्किंचितही जाणीव नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार केला जातो. भाजपच्या उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, उत्तराखंड राज्यातील यशाचे शिल्पकार धर्मेंद्र प्रधान यांनाच समजले जाते. इतकचं नाही तर पक्षांतर्गत कोणत्याही प्रकारचा पेच प्रसंग निर्माण झाल्यास त्यांना ‘संकटमोटक’ म्हणून कामगिरी करावी लागते. ओडिशामधील २४ वर्षांची नवीन पटनायक यांची सत्ता त्यांच्या खास रणनीतीमुळे भाजपला मिळाली. विशेष म्हणजे पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्याच्या कामगिरीवर ‘बारकाईने’ लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांनाच मंत्रिमंडळातून कसे हाकलायचे? त्यामुळेच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय घेणे भाजपसाठी अत्यंत कठिण झाले आहे. त्यांचा राजीनामा घेतल्यास संघ परिवार नाराज होऊ शकतो. आता तर धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील संताप हा केवळ भाजपपुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरातील अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तींमध्ये त्यांच्याबाबत नाराजी आहेत. देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून स्पर्धा परीक्षांना सामोरे जातात. अशा वेळी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे किंवा प्रशासनावरील अविश्वासामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल खचते.
गुणवत्तेपेक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याचा सर्वात मोठा फटका सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनाच बसतो. पण सरकार किंवा धर्मेंद्र प्रधान हा सर्व प्रकार लाईटली घेत आहेत. यापूर्वीही अनेकदा भाजपच्या वादग्रस्त नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र, भाजपने कोणत्याही मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला नाही. राजकीय दबावामुळे मंत्र्यांचा राजीनामा सक्तीने घेतला जाऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे. यामुळे दबावापुढे सरकार झुकल्याचा संदेश विरोधकांना जाईल, असे मोदींना वाटत असावे. कोणत्याही परिस्थितीत सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांना कोणत्याही प्रकारचे श्रेय जाऊ नये, याची भाजपकडून प्रचंड काळजी घेतली जात आहे. देशाला विकासाकडे झेप घ्यायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या शांतीपुर्वक संवैधानिक मार्ग स्विकारावा लागेल, हा संदेश दिल्लीतील आंदोलनातून सरकारला देण्यात आला. विझलेल्या करोडो तरूण मशाली पुन्हा प्रज्वलीत करण्याचे सामर्थ्य सोनम वांगचुक व अभिजीत दीपके यांनी सिद्ध करून दाखविले.
देशातील तरूणांना आता गृहीत धरून चालणार नाही. हाच तरूण पेटून उठला तर त्यांचे तख्त पलटी होवू शकते, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच ताणाशहांना चपराक बसली, हे बरेच झाले. पूढे चर्चेअंती निश्चितच जे काही होईल ते नक्कीच सकारात्मक असेल, अशी आशा बाळगायला भरपूर वाव आहे. कारण वांगचुक रुग्णालयात असले तरी अभिजीतने अजून मैदान सोडलेले नाही. अभिजीत दिपके कौतुकास आणि गौरवास पात्र ठरला आहे. आजपर्यंत भल्या भल्यांना हे जमले नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून जात व धर्म हद्दपार करून लाखो तरूणांनी त्याला आपला नेता मानले, त्याच्यावर विश्वास टाकला आणि अखेरपर्यंत तेवढ्याच विश्वासाने साथही दिली. आपल्या नेत्यांच्या वाटेला असा दुर्मिळ प्रसंग अनुभवता आला नाही, म्हणूनही दिपके सरस ठरतो आणि अभिनंदनीय वाटतो.
सरकारला शेवटी गुडघ्यावर आणले व सरकारद्वारे चर्चेची दारे खूली झाली, ही साधी कामगिरी नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल किंवा नाही, परंतु सरकारला या ‘प्रधाना’च्या माध्यमातून बदनामीचे शिक्के बसले हे मान्य करावेच लागेल. शिक्षण हा कोणत्याही सरकारचा प्रचाराचा विषय नसून राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. त्या पायात तडे गेले तर इमारत कितीही भव्य असली तरी ती टिकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करणे, शिक्षण व्यवस्थेला पारदर्शक बनवणे आणि प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला न्याय मिळेल याची खात्री देणे, हीच आजच्या शिक्षणमंत्र्यांसमोरील खरी कसोटी आहे. ते जर जमत नसेल तर धर्मेंद्र प्रधान यांनी खरोखरच राजीनामा देऊन आराम करावा







