
अहिल्यानगर | प्रशांत बाफना
: महाराष्ट्र शासनाच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन पोर्टलवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. शेतकऱ्यांना सेतू केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे अनेक पात्र शेतकरी अद्याप ई-केवायसी पूर्ण करू शकले नसल्याने कर्जमाफीच्या लाभाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील विविध सेतू केंद्रांवर सकाळपासून शेतकऱ्यांची मोठी गद होत आहे. दिवसभर सर्व्हर प्रतिसाद देत नसल्याने अनेक सेतू केंद्र चालक रात्री उशिरा तसेच पहाटे शेतकऱ्यांना बोलावून ई-केवायसी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यावेळीही अनेक शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये फार्मर आयडी उपलब्ध नाही असा संदेश दिसत असल्याने प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची बाब समोर आली आहे.
याशिवाय काही प्रकरणांमध्ये कर्जदार व वारसदार यांच्या नोंदींमधील तफावत, तसेच माहितीतील विसंगतीमुळेही ई-केवायसी रखडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने तांत्रिक अडचणी दूर करून पोर्टल सुरळीत सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
प्रशासनाची भूमिका
पाथड-शेवगाव उपविभागाचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी, याबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
रात्री-पहाटेही सेवा; तरीही तांत्रिक अडचणी कायम
मिरी येथील सेतू केंद्र चालक रवींद्र शिंपणकर म्हणाले, दिवसभर सर्व्हर चालत नसल्याने शेतकऱ्यांचा लाभ अडकू नये म्हणून रात्री आणि पहाटेही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, फार्मर आयडी संदर्भातील तांत्रिक त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
फार्मर आयडी असूनही उपलब्ध नाहीचा संदेश
शिंगवे केशव येथील शेतकरी सुदाम गाडेकर म्हणाले, माझ्याकडे फार्मर आयडीसह सर्व आवश्यक माहिती उपलब्ध असूनही पोर्टलवर फार्मर आयडी उपलब्ध नाही असा संदेश येत आहे. त्यामुळे ई-केवायसी पूर्ण होऊ शकलेली नाही.
कर्जदार व वारसदारांच्या माहितीतील तफावतीमुळे अडचणी
मिरी सेवा संस्थेचे सचिव सुनील मुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी कर्जदार आणि वारसदार यांच्या माहितीतील तफावत असल्याने अडचणी निर्माण होत आहेत.
वरिष्ठांकडे तांत्रिक अडचणींचा अहवाल
पाथर्डीचे सहाय्यक निबंधक गोकुळ नांगरे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेकडील माहितीच्या आधारे सेवा संस्थांमार्फत शेतकऱ्यांकडून आवश्यक माहिती गोळा करण्यात आली आहे. ई-केवायसीदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी वरिष्ठ कार्यालयाच्या निदर्शनास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणून दिल्या असून त्या लवकरात लवकर दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत







