
जामखेडच्या नागपंचमीचे बदलते स्वरूप…
अहिल्यानगर/ प्रशांत बाफना
कोणे एके काळी जामखेड शहरातील चौकाचौकात नागपंचमीच्या दिवशी डाव उभा राहायचा. डावाच्या तयारीची लगबग अनेक दिवस आधीपासूनच सुरू असायची. मंडळाचे कार्यकर्ते संबळ, टिपऱ्या यांची रियाज करत असत. स्टेज रंगीबेरंगी बॅनरने सजवले जायचे. बल्ब, ट्यूबलाईटच्या आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघायचा.
सुप्रसिद्ध बँडमास्टर आपल्या कलेतून सनईचे मंजुळ सूर काढत आणि बँडच्या तालावर नऊवारी साडी नेसून, किलो-किलो घुंगरू बांधून, नटून-थटून, डोक्यावर पदर घेत कलाकार हजेरीसाठी सज्ज होत असत. त्यांच्या अदाकारीला मनमोकळी, पण तितकीच आदबशीर दाद देणारा दर्दी आणि सुजाण प्रेक्षकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित असायचा. महिला प्रेक्षकांचाही उत्स्फूर्त सहभाग असायचा.
यानंतर ग्रामदैवताला मान देण्यासाठी सर्व तरुण मंडळे बँड पथक, लेझीम, टिपऱ्या, संबळ, टेंभे आणि बत्त्यांच्या प्रकाशात श्रीनागेश्वर मंदिराकडे मिरवणुकीने जात असत. त्या मिरवणुकीतील उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि घुंगरांचा नाद यामुळे संपूर्ण जामखेड शहर भक्तिमय आणि उत्सवी वातावरणात न्हाऊन निघायचे.
दुसऱ्या दिवशी असायची ‘सकरोबा’ची पर्वणी. श्रोत्यांसाठी ही रात्र म्हणजे जणू सांस्कृतिक मेजवानीच असायची. रात्रभर डाव रंगायचा. काही जण बसून तर काही जण उभे राहून नृत्य आणि कलाविष्काराचा आनंद घेत असत. तिसऱ्या दिवशी तहसीलच्या मैदानावर कलाकारांच्या सामन्यांना रंगत यायची. उत्कृष्ट कलाविष्कार सादर करणाऱ्या कलाकारांचा प्रशासनाच्या वतीने सन्मानही केला जायचा.
नागपंचमी आणि पावसाचेही जामखेडकरांचे एक वेगळे नाते होते. ‘नागपंचमीचे घुंगरू वाजले की पाऊस धो-धो बरसतो,’ असे त्यावेळी आवर्जून म्हटले जायचे. त्यामुळे नागपंचमीचा उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नव्हता, तर जामखेडच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविष्काराचा अविभाज्य भाग होता.
मात्र काळ बदलला आणि त्याबरोबर उत्सवाचे स्वरूपही बदलले. आधुनिक मनोरंजनाची साधने आली, पारंपरिक कलांना व्यासपीठ कमी मिळू लागले आणि चौकाचौकात रंगणारे डाव, सनईचे सूर, नऊवारीतील घुंगरांचा नाद आणि त्या कलेला मनापासून दाद देणारा दर्दी रसिकवर्ग हळूहळू इतिहासजमा होऊ लागला.
आज नागपंचमीचा उत्सव साजरा होतो; मात्र पूर्वीच्या त्या उत्साहाची, त्या सांस्कृतिक परंपरेची आणि त्या आठवणींची उणीव जाणवते.
काळ बदलला तसे सर्व काही बदलले… नागपंचमीही त्याला अपवाद राहिली नाही.
पूर्वीच्या नागपंचमीच्या आठवणी आजही जामखेडकरांच्या मनात ताज्या आहेत. सनईचा मंजुळ सूर, नऊवारीतील घुंगरांचा नाद आणि कलाकारांना मनापासून दाद देणारा दर्दी रसिक—हीच तर होती जामखेडच्या नागपंचमीची खरी ओळख







