
उपसंपादक मन्सूर तडवी
चोपडा / यावल : चोपडा तालुक्यातील मौजे वरगव्हाण व इतर बहुल आदिवासी गावे PESA (पेसा) क्षेत्रात समाविष्ट करावीत, या प्रमुख मागणीसह आदिवासी तडवी भिल एकता मंच, महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे दि. 15/09/2026 पासून उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती एकता मंच संघटनेतर्फे देण्यात आली आहे
संघटनेने दि. 31/08/2026 रोजी एकात्मिक आदिवासी विकास विभाग, प्रकल्प कार्यालय, यावल यांना वरगव्हाण गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर दि. 04/09/2026 रोजी आदिवासी समाजाच्या विविध हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा निवेदन देण्यात आले. 8 दिवस उलटूनही कार्यालयाने मागण्यांचे गांभीर्याने विचार न केल्याने अखेर उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख 10 मागण्या:
- आदिवासी विकास विभागाचा कोणताही निधी इतर विभागांना न देता सर्व योजना थेट प्रकल्प कार्यालयामार्फतच राबवाव्यात.
- तात्पुरती बंद असलेली शबरी घरकुल योजना पूर्ववत सुरू करावी.
- न्यूक्लियस बजेट योजनेत वैयक्तिक लाभ 50 हजारांवरून 1 लाख करावा व 100% अनुदान द्यावे.
- ठक्करबाप्पा योजना व धरती आबा योजना प्रभावीपणे राबवावी.
- पाचोरा तालुक्यात व भविष्यात जिल्हा होण्याची शक्यता असलेल्या भुसावळ शहरात आदिवासी मुला-मुलींसाठी नवीन शासकीय वस्तीगृहे सुरू करावीत.
- आश्रमशाळा व वस्तीगृहातील सर्व कंत्राट/टेंडर स्थानिक आदिवासी बांधवांनाच द्यावेत.
- यावल तालुक्यातील अतिदुर्गम गाड्या, जामन्या, उसमळी व लंगडाआंबा या गावांना/पाड्यांना पक्के रस्ते द्यावेत.
- शबरी वित्त व विकास महामंडळ (नाशिक) अंतर्गत सन 2024-25 मधील मंजूर कर्ज तात्काळ वितरित करावे व 35% सबसिडी लागू करावी.
- वनहक्क कायदा 2006 अंतर्गत प्रलंबित दावे तात्काळ निकाली काढावेत.
- मौजे वरगव्हाण ता. चोपडा सह इतर आदिवासी बहुल गावे तात्काळ PESA क्षेत्रात समाविष्ट करावीत.







