
जळगाव/नाशिक : शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला आता वेग आला असून, जळगाव जिल्ह्यातील नूतन मराठासह आणखी तीन शाळांमधील शिक्षकांची नाशिक येथे चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने जळगाव शहराकडे मोर्चा वळवला आहे. शहरातील मराठा विद्या प्रसारक समाज संचलित माध्यमिक विद्यालयात ३० सप्टेंबर रोजी सुमारे तीन तास ठाण मांडून कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी नूतन मराठासह जिल्ह्यातील तीन शाळांच्या प्राचार्य व शिक्षकांना नाशिक येथे बोलावून चौकशी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
नियुक्तीपासून शालार्थ आयडीपर्यंत कागदपत्रांची पडताळणी
तपास यंत्रणेकडून संशयित शिक्षकांच्या नियुक्तीपासून त्यांच्या शालार्थ आयडीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची पडताळणी केली जात आहे. संबंधित शिक्षकांच्या नियुक्तीशी संबंधित कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, मान्यता तसेच शालार्थ आयडीसाठी सादर करण्यात आलेल्या नोंदी तपासल्या जात आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलिसांचे विशेष पथक मागील काही आठवड्यांपासून जळगाव जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये कागदपत्रांची तपासणी करत आहे. तपासादरम्यान काही महत्त्वाचे दस्तऐवज पथकाच्या हाती लागल्याची शक्यता असून, त्याआधारे पुढील चौकशी सुरू असल्याचे समजते.
नूतन मराठाच्या प्राचार्यांसह १२ शिक्षकांची चौकशी
अमळनेरचे आमदार शरद शिंदे यांच्या मतदारसंघातील शाळेतील तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा काकोडा येथील शाळेतील शिक्षकांना नोटीस बजावून नाशिक येथे वन-टू-वन चौकशी करण्यात आली. नूतन मराठाचे प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्यासह तब्बल १२ शिक्षकांची रात्री उशिरापर्यंत चौकशी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, नूतन मराठा विद्यालयातील १२ शिक्षकांच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांची उपशिक्षक म्हणून नोंद संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे चौकशीदरम्यान सांगण्यात आल्याचे वृत्त आहे.
मान्यता आणि शालार्थ आयडी प्रक्रियेतील विसंगती तपासाच्या केंद्रस्थानी
शिक्षकांची मान्यता आणि शालार्थ आयडी मिळविण्याच्या प्रक्रियेत विसंगती आढळल्याने तपास यंत्रणेचा संशय अधिक गडद झाला आहे. या विसंगतींचा संबंध नेमका कुठपर्यंत पोहोचतो आणि त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध तपास पथक घेत आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांची हाताळणी अत्यंत संवेदनशील पद्धतीने केली जात असून, तपासाची दिशा आणि कागदपत्रांबाबत कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात असल्याचे समजते.
शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता जळगावातील शाळांपासून नाशिकपर्यंत पोहोचल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी चौकशीत आणखी कोणती नावे समोर येतात आणि या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.







