
जेव्हा केव्हा हिमालय(देश) अडचणीत आला, तेव्हा तेव्हा त्याच्या मदतीला सह्याद्री(महाराष्ट्र) धावून गेला. हा इतिहास आजचा नाही पारतंत्रवादी असो की स्वातंत्रवादी, देशाच्या अखंड एकतेसाठी देशाच्या स्वाभिमान आणि समतेसाठी हा सह्याद्री छातीचा कोट करत निधड्या छातीने अन्यायाविरूद्ध आवाज उठवतो आणि त्या आवाजाला अवघा देश साद घालतो हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतयं. या देशात पारतंत्रवाद्यांनी ज्या जुलमी राजवटी चालवल्या त्या विरूद्ध तरुणांनी क्रांती केली. भगतसिंह, सुखदेव, राजगुरूंसारखे तरणे ताठे पोरं हसत हसत फासावर गेले. स्वातंत्र्याच्या कार्यकाळात इंदिरा गांधींनी आणीबाणी देशावर लादली. त्या विरूद्ध जेपींनी उभ्या देशात रान पेटवलं, हा इतिहास आणि संघर्ष अद्याप संपलेला नाही. देश हितासाठी, देशाच्या स्वाभिमानासाठी सत्य आणि न्यायासाठी या अखंड हिंदुस्थानचा तरुण आजही तेवढ्यात ताकदीने लढतोय आणि त्याचं नेतृत्व महाराष्ट्र करतोय हे अभिमानास्पदच. 2011 साली 70 वर्षाच्या तरुणाने दिल्ली झुकवली, काँग्रेसी राजवटीला अण्णा हजारेंनी उलथून टाकले, ते आंदोलन मै भी अण्णा, तु भी अण्णा, घर घर अण्णा असं म्हणत चेतलं होतं, पेटलं होतं. त्यानंतर 2014 साली अच्छे दिनचे स्वप्न दाखवत या देशात भारतीय जनता पार्टीचं राज्य आलं. वाटलं दाखवलेले स्वप्नं पुर्तीकडे हे सरकार वाटचाल करेल परंतू गेल्या 12 वर्षाच्या कालखंडात भारतीय जनता पार्टीने लोकांच्या मुलभूत गरजांवर गदा आणला, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला अक्षरश: बाटून टाकले. न्याय व्यवस्था अधिक आंधळी होवून बसली अन् सुरक्षा यंत्रणा सरकारची बटीक झाली. जात पात धर्म पंथाला अनन्य साधारण महत्त्व आलं. हिंदु-मुस्लिम, दलित-संवर्ण इथपर्यंत हा जातीवाद थांबला नाही, मराठा-वंजारा, ब्राम्हण-मराठा, शुद्र-उच्च वर्णीय, नव्हे नव्हे तर महार-मांग यांच्यात तेढ निर्माण केलं जावू लागलं. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात 12 वर्षाच्या कालखंडात 120 पेक्षा जास्त वेळा पेपर फुटी झाली. न्याय दरबारी दाद मागितली तेव्हा त्याच तरुणाईला झुरळ म्हणून हिनवण्यात आलं. इथंच तरण्याताठ्या पोरांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मनगटे शिवशिवू लागली. निधड्या छात्या फुगू लागल्या, अन् कुठं अमेरिकेत बसलेल्या महाराष्ट्राच्या पोराला संताप आला अन् त्यानं झुरळ जनता पार्टी नावाची एक पोस्ट सोशलमिडियावर टाकली. तिथंच ठिणगी पडली. जंतर मंतरवर भाजप सरकारविरोधात टेंभा पेटला आणि हा हा म्हणत 32 दिवसात हा वनवा देशभरात भडकला. 2011 नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या पोरानं दिल्ली तख्त गदा गदा हलवून टाकलं, अभिजित दिपके नावाच्या निडर तरुणाच्या पाठीशी होते काय? संविधान! न्याय निती!! सत्यासाठी लढण्याची धमक!!! भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो!!! अन् जय भीमचा नारा! महाराष्ट्राच्या पोरानं पुन्हा एकदा दिल्ली तख्ताला सह्याद्रीचा हिसका दाखवला.
अण्णा हजारे नावाच्या 70 वर्षाच्या तरण्याताठ्या महाराष्ट्राच्या गांधी टोपीने तत्कालीन काँग्रेस सरकारला अहिंसेच्या उपोषणातून कुपोषीत केले. 2011 साली अण्णा हजारेंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केले, तेव्हाही देश महाराष्ट्राच्या या सत्तर वर्षाच्या तरण्या ताठ्या गांधीवादी, अहिंसावादी माणसासोबत उभा राहिला. तत्कालीन पंतप्रधान (जे की शिकलेले) अर्थ तज्ञ मनमोहनसिंग यांना पायउतार व्हावे लागले. देशाच्या नागरीकांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातून काँग्रेसला अक्षरश: उपटून फेकले अन् या देशात जणू चिखलात कमळ उमलले असा काहीसा फास 2014 ला प्रत्येक भारतीयाला झाला. महाराष्ट्राने देशावर मोठे उपकार केले, सह्याद्रीने हिमालयाची मान पुन्हा उंचावली असे भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाला वाटले, मोदी मोदीचा जय जयकार होवू लागला, अच्छे दिनचे स्वप्न मध्यरात्री नव्हे तर पहाटे पडू लागले, दिवसामागून दिवस गेले, भाजपेयांनी खायचे दात दाखवायला सुरूवात केली अन् इथंच रुपयाच्या घसरणीपासून सर्वसामान्य माणसाच्या घरातले तेल, मिठ अक्षरश: गायब होत गेले. खायच्या तेलापासून गाडीत टाकायच्या तेलापर्यंत भाव गगनाला भिडले, आरोग्यात तेच, खत बी-बियाणे महागले, शिक्षण महागलं अन् दर्जा खालावला, पेपर फुटू लागले, मेहनत करणार्या पोरांनी आत्महत्या केल्या. तरी सरकारला याचं देणं घेणं नव्हतं, उलट
हे भाजपाचं सरकार
इथे राजीनामे होत नाहीत
असे वक्तव्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. बेजबाबदार वर्तन अन् अहंकाराची भाषा हे ब्रिद भाजपाने कायम जपलं, निवडणूका जात, पात धर्मावर लढायच्या, सत्तेत आलं अन् कुणी प्रश्न केला की संबंधीताला दहशतवादी, देशद्रोही म्हणून ट्रोल करायचं, हा धंदा भाजपाने गेल्या 14 वर्षात यशस्वी सुरू ठेवला. हिदू, मंदिर, देश यामध्ये तरुणाई कशी अडकली जाईल याचा पुरेपूर वापर सोशलमिडियाच्या माध्यमातून केला गेला. देव, देश, धर्म म्हटलं की प्रत्येकजण, देव देश धर्मासाठी प्राण आपले लावू म्हणत भाजपाचा जय जय कार करत राहिला परंतू वस्तूस्थिती उलट राहिली, प्रश्न विचारणारा गद्दार आणि दहशतगर्द, त्याला विदेशातून फंड असे सरकार सातत्याने म्हणत राहते, शोधत राहते परंतू आमच्या सैनिकांना स्फोट घडवून मारण्यात आले ते आरडीएक्स कोठून आले याचा शोध भाजप सरकारला घेता येत नाही. जसे राजनाथ सिंह अहंकाराने बोलले तसे कॉक्रोच जनता पार्टी च्या आंदोलनाला कायम पाण्यात पाहणार्या भाजपच्या नेत्यांसह मंत्र्यांनी कधी भाडे के टट्टू, कधी चिनी एजंट, नक्षलवादी, अतिरेकी, दहशतवादी म्हणून हिनवलं, नव्हे नव्हे तर
कॉक्रोचज्यांना
फासावर लटकवा
असे बेताल वक्तव्य भाजपाच्या पियुष गोयलने केले. पियुष गोयल एका व्हिडीओमध्ये म्हणतात, माझे असे स्पष्ट मत आहे, आंदोलनातील दोन तीन कॉक्रोच यांना जाहिररित्या फासावर लटकविले पाहिजे. त्या फासावर लटकविलेल्या कॉक्रोचजांना पाहून आम्ही खरे कोण आहोत, आमची ताकद काय आहे, आम्ही काम करू शकतो आणि कोणत्याही स्तराला जावू शकतो हे त्यांना कळेल. यासह अन्य बेताल वक्तव्य त्यांच्याकडून झाले. कोणी आंदोलकांना दहशतवादी म्हटलं तर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याच्यांनी रुपया सांभाळला जात नसतांनात या पेपरफूटीचे फायदे सांगत राहिल्या. पेपर फूटल्यामुळे दुसर्यांदा पेपर घ्यावा लागला, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला. हे या देशाच्या अर्थमंत्र्यांचे वक्तव्य. परंतू कॉक्रोच जनता पार्टी आपल्या न्याय हक्कासाठी आपल्या छातीचा सह्याद्री कोट करत जंतर मंतर वर तटून बसली तेव्हा
वरूण रांगडा,
दणकट काळा
मराठमोळा, मराठी माणूस जेव्हा न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तो माघार घेत नाही हे अभिजित दिपके नावाच्या तरुणाने दाखवून दिले. छ. संभाजीनगरचा अभिजित दिपके सर्वसाधारण घरातला पोरगा, जेव्हा तो अमेरिकेतून भारतात आला तेव्हा लाखो फॉलोअर्स त्याची वाट पाहत होते. तर दुसरीकडे सत्ताधारी, भक्तगण अभिजितला ट्रोल करत होते. भारताचे सरन्यायाधिश यांनी अखंड देशातल्या तरुणाईला कॉक्रोच म्हणून हिनवले होते, एवढे तुम्ही षंढ कसे, पायाखाली आग तरी थंड कसे! जो तो प्रत्येकाला म्हणत होता. आंदोलन ठरलं, जंतर मंतरवर सुरू झालं, पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी आंदोलनाला पाठींबा दिला, ते स्वत: उपोषणाला बसले, तोपर्यंत भाजपाने म्हणण्यापेक्षा केंद्र सरकारने या आंदोलनाकडे डुंकून पाहिले नाही. वांगचुक यांची तब्येत बिघडली, त्यांना अक्षरश: फरफटत उचलून दवाखान्यात नेहण्यात आलं, अभिजित दिपकेने आंदोलनाचे सुत्र हाती घेतले, स्वत: उपोषणाला बसला, 20 जुलै रोजी तरुणाईचा वनवा हा संसदेच्या दिशेने निघाला, पोलीसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला केला, पोरं पोरी रक्तबंबाळ झाला. तरुण पोरीच्या छाताडावर पाय दिले गेले, तिकडे संसदेतून पोरांवर बंदूका रोखल्या गेल्या, इकडे 56 इंच छातीवाले संसदेतून गपचूप बाहेर गेले. आणि उभा देश
इन्क्लाब जिंदाबाद!
चा नारा देत तरुणाईच्या बाजूने उभा राहत गेला. मागण्या त्याच होत्या, शिक्षण क्षेत्रात बदल घडला पाहिजे., आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा, या मागण्या घेवून जंतर मंतर तेवत ठेवण्याचं काम अभिजित दिपकेंनी केलं. तेव्हा कुठं केंद्र सरकारला चर्चा करावीशी वाटली, चर्चेला सुरूवात झाली, हा हा म्हणता पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी सशर्त उपोषण सोडलं, तोपर्यंत केंद्र सरकार आता आपण जिंकलो या अविर्भावात आणि आंदोलन
गुंडाळू या फाजील आत्मविश्वासात पुढची रणनिती आखत राहिलं. आंदोलनाला बदनाम करावं यासाठी अचानक 21 तारखेला सोशलमिडियावर आंदोलनाच्या विरोधात पोस्ट पडू लागल्या. तिथे भक्तांची टोळधाड आल्याचे लक्षात आले. मात्र मराठी माणूस वाकेल पण झुंकणार नाही, हे महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहित होतं, तसं दिपके झुकले नाही, टोळधाडीच्या टिका अंगावर झेलत राहिले अन् इनक्लाब जिंदाबादचे नारे देशभरात गंजत राहिले. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब यासह अन्य राज्यांमध्ये तरुणाई रस्त्यावर उतरली तेव्हा
मित्रो म्हणणारे फ्रेंड्स
झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे की टापटिपपणामध्ये सातत्याने चर्चित असतात. त्यांचे व्हिडीओ थेट मिडियाला जातात आणि गोदी मिडिया मास्टर स्ट्रोक म्हणून त्या व्हिडीओच्या बातम्या करतात. प्रत्येक व्हिडीओची सुरूवात, भाषणाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मित्रो म्हणत करतात. परंतू 22 च्या मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ आला तो 2 मिनिट 55 सेकंदाचा होता आणि विशेष म्हणजे तो त्यांनी स्वत: काढल्यासारखा दिसत होता, त्यातून त्यांनी परिक्षा सुधारणा कशा होतील, कोणते कायदे होणार हे सांगितले. मात्र शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानाच्या बाबतीत ब्र शब्दही काढला नाही. कितीही तरुणाईने धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अट्टहास धरला, दुसर्या दिवशी 1 मिनिटाचा व्हिडीओ काढला तेव्हाही तरुणाई मागे हटत नाही हे पाहितल्यानंतर अखेर काल दुपारी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. जंतर मंतर वर जेवढा जल्लोष तेवढाच देशभरात जल्लोष पहायला मिळाला. तो धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापेक्षा
मोदी, शहांच्या अहंकाराचा!
पराभव झाला. यात देशवासियांना अधिक आनंद दिसून आला. जसेच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आला तसे महाराष्ट्राच्या या मराठी पोराने व्यासपिठावरून आनंदोत्सव साजरा करताना सरकार म्हणत होतं इथं राजीनामा होत नाही हे तरुण आहेत इथं न्याय आणि सत्तेसाठी आवाज उठवला जाईल, सरकारला प्रश्न विचारले जातील, राजीनामे घेतले जातील, ही तर फक्त सुरूवात आहे असं म्हणत अभिजित दिपकेंनी मोठ्या अभिमानाने, स्वाभिमानाने त्या ठिकाणी म्हटले. ’हा मराठी माणूस आहे, वाकन पण झुकणार नाही!’ अभिजित दिपकेंच्या आंदोलनाला गेल्या 12 वर्षात जे कोणाला यश मिळवता आलेलं नाही ते यश मिळालं. झेन-जींनी अक्षरश: सरकारच्या झिंज्या उपटविल्या. अन् तरुणाईंनी हे आंदोलन अंधभक्त विरूद्ध देशभक्त, शुन्य एकने जिंकलं. तिथेच ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ चा नारा निनादला
प्रशांत बाफना







