
खिर्डी, ता. रावेर | प्रतिनिधी : उमेश तायडे
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी गावातील बसस्थानक परिसरासह मुख्य रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून परिसरात तलावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले असून व्यापारी, प्रवासी, विद्यार्थी आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ता पाण्याखाली गेल्याने नागरिकांना पाण्यातूनच जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. अनेक दुचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याने वाहनचालकांना वाहने ढकलत न्यावी लागली. तसेच पाण्याचा वेग आणि रस्त्यावरील खड्डे न दिसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानांसमोर पाणी साचल्यामुळे ग्राहकांची वर्दळ घटली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून दिवसभर दुकाने उघडी ठेवूनही अपेक्षित उलाढाल होत नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बसस्थानकावर येणाऱ्या प्रवाशांनाही जलभरावामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून बसमध्ये चढताना व उतरताना मोठी गैरसोय होत आहे.
विद्यार्थ्यांनाही शाळा व महाविद्यालयात जाताना पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी गटार व्यवस्था किंवा जलनिस्सारण यंत्रणा नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या उद्भवते. याबाबत ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना याच समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने साचलेल्या पाण्याचा निचरा करून बसस्थानक परिसर व मुख्य रस्त्यावरील जलभरावाची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.







