
५ ते ६ कोटींच्या दुरुस्ती कामांची चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू’ – निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये खेळाडू आणि सकाळ-सायंकाळ मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून आकारण्यात येणारे मनमानी शुल्क तात्काळ रद्द करून क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा क्रीडा संकुल दुरुस्तीच्या कारणास्तव विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंसह मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात मागील सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्तीची कामे पूर्ण झाली होती. मात्र राजकीय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत संकुल सुरू करण्यात विलंब करण्यात आला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न होत असतानाच शहरातील विविध खेळाडू, विद्यार्थी व नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव आणला. त्यामुळे प्रशासनाला अखेर क्रीडा संकुल खुले करण्यास भाग पडले.
मात्र संकुल सुरू झाल्यानंतर देखभालीसाठी निधी नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने विविध क्रीडा प्रकारांसाठी वार्षिक ९ हजार रुपयांपासून ते तब्बल ५६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच केवळ चालण्यासाठी किंवा व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून प्रति तास ५० रुपये शुल्क आकारण्याचाही निर्णय घेतल्याने खेळाडू आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीच्या नावाखाली ५ ते ६ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच शहरातील खेळाडू, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि आरोग्यासाठी चालणाऱ्या सर्व नागरिकांना क्रीडा संकुलातील उपलब्ध सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने खेळाडू, नागरिक आणि कार्यकर्त्यांसह तीव्र स्वरूपाचे लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव पाचवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







