
प्रशांत बाफना
धीरज परदेशी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला. धिरजवर झालेला जीवघेणा हल्ला हा पूर्वनियोजित कट होता हे आता लपून राहिलेले नाही. धीरजवर हल्ला झाल्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मॅककेअर हॉस्पिटलच्या प्रमुखांसोबत घटनेनंतर काही मिनिटांमध्ये पोलिस अधीक्षक सुदर्शन ममुका यांनी प्रकृतीची माहिती घेतली. प्रकृती चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लागलीच नगरमध्ये या घटनेचे पडसाद काय उमटू शकतात याची जाणिव सुदर्शन यांना झाली. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली आणि शेजारच्या जिल्ह्यातील पोलिस कुमक मागवून घेतली. जोडीला शिघ्रकृती दल, राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही रात्रीच दाखल झाल्या. नगर शहरातील संवेदनशिल भागाच्या जोडीने घटनास्थळाच्या परिसरात जास्तीचा पोलिस बंदोबस्त लावला गेला. नगरमध्ये काहीतरी घडणार याची जाणिव नगरकरांना झाली. सामजिक शांतता भंग करणाऱ्यांना कोणतीच संधी द्यायची नाही या इराद्याने एसपींनी स्वत: लक्ष घातले. धीरज परदेशी याला मृत घोषीत करण्यात आल्यानंतर जागोजागी लावण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्ताने नगर शहरातील नियोजित ठरु पाहणारी जातिय दंगल शमली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र, त्याचवेळी गेल्या तीन दिवसांपासून नगर शहराचाच भाग असणाऱ्या मुकुंदनगर भागाला पालिका कर्मचाऱ्यांनी वेठीस धरले. मुकुंदनगर, फकीरवाडा व दर्गादायरा परिसरातील पाणीपुरवठा, कचरा संकलन, घंटागाडी, स्वच्छता, आरोग्यसेवा, जलनिस्सारण व पथदिवे या सुविधा बंद ठेवल्या गेल्या. आयुक्तांनी प्रमुख या नात्याने यात हस्तक्षेप करण्याची गरज होती. हा भागच मनपा हद्दीतून वगळा अशी मागणी करण्यापर्यंत कर्मचारी जातातच कसे? संरक्षण द्या, मग काम करतो अशी मागणी संयुक्तीक असताना बहिष्काराची अन् दर्पोक्तीची भाषा वापरणाऱ्यांवर आता कारवाई होणार का? महानगरपालिका आयुक्तांनी वैधानिक कर्तव्य पार पाडण्यात केलेल्या कसुरीची विभागीय आयुक्त अथवा स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत कालबद्ध चौकशी करण्याची मागणी त्यातूनच पुढे आली.
मुकुंदनगरच्या शहाबाजचं नेमकं कनेक्शन काय?
फिलिस्तीन, पाकिस्तान कनेक्शन वरून राजकीय वणवा पेटताना पहायला मिळत असला तरी मुकुंद नगरच्या शहाबाजच नेमकं या प्रकरणात काय कनेक्शन आहे याचा पोलिसांकडून तपास झाला पाहिजे. नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांना अनुमोदक असणारा शहबाज आणि या प्रकरणातील शहबाज एकच आहेत की वेगळे याची चर्चा झडू लागली आहे. घटनेच्या आधी आणि नंतरचे आरोपींचे सीडीआर, एसडीआर पोलिसांनी तपासले तर यातून अनेक धक्कादायक बाबी समोर येतील.
मुकुंदनगरकर जीव मुठीत धरून बसले असताना खासदार नीलेश लंके नॉट रिचेबल!
मतदारसंघांमध्ये मोठी घटना घडून देखील खासदार निलेश लंके यांचं या अनुषंगाने एक ओळीचं स्टेटमेंट वाचण्यात आलं नाही. धर्मनिरपेक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीकडून लोकप्रतिनिधित्व करताना खरंतर धार्मिक सलोखा जपणारी भूमिका त्यांच्याकडून मांडली जाणं अपेक्षित होतं. पण ज्या मुस्लिम समाजाला त्यांनी आपल्या निवडून येण्याचा श्रेय दिलं होतं आज त्यांच्यासाठीही ते उभे राहताना दिसत नाहीत. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तेव्हा लंके नॉट रीचेबल झाल्याचे यापूर्वीही अधोरेखीत झाले आणि आता देखील तसेच झाले. आता नॉट रिचेबलच राहणार असं समीकरण समजून घ्या अशी टीपणी दस्तुरखुद्द मुकुंदनगरमधूनच होऊ लागली आहे.
आरोपी आलमगीरचे आणि रहिवासी दर्गादायऱ्याचे; तरीही बदनामी मुकुंदनगरची!
धीरजची हत्या करणारे आरोपी मुळचे दर्गादायरा येथील. तेथे त्यांची जुनी घरे. मात्र ते वास्तव्य करुन राहतात आलमगीरमध्ये. घटनेच्या दिवशी ते दर्गादायरा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. दर्गादायरा भागाला विद्युत पुरवठा गेला आहे तो मुकुंदनगरमधून! तेथील विजेचा तांत्रिक बिघाड झाल्याने धीरज व त्याच्या अन्य दोघा सहकाऱ्यांना त्यासाठी वरिष्ठांच्या सुचनेनुसार जावे लागले. हल्लेखोरांना धीरज तेथे दिसला आणि त्यांनी पूर्ववैमनस्यातून त्याच्यावर हल्ला चढवला. त्यात गंभीर जखमी झाला. दर्गादायऱ्यात धीरजवर हल्ला झाला त्यातील काही भाग मनपा हद्दीत तर काही भाग नागरदेवळा ग्रामपंचायत हद्दीत. या संपूर्ण प्रकरणात मुकुंदनगरच्या वाट्याला बदनामी आली. नागरिकांना प्रचंड त्रास झाला आणि मनस्तापही!
झा..भरची भाषा बोलणाऱ्या अक्षय कर्डिलेंना आवर घालण्याची गरज!
पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या चौकात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात बोलताना आमदार अक्षय कर्डिले यांनी आपल्या दिवंगत वडिलांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. ही आठवण करुन देताना आ. अक्षय यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषा वापरली. मोर्चातील महिलांना देखील या भाषेने खाली मान घालावी लागली. तुमच्या झा..भर मतांची गरज नाही, अशी टिपणी या दुःखदप्रसंगी त्यांनी केली. त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. धीरजला न्याय मागण्यासाठी एस पी ऑफीस समोर मृतदेहाची ऍम्ब्युलन्स थांबवण्यात आली आहे की राजकीय सभा आहे असा संभ्रम अनेकांना पडला. मतांचा जोगवा मागणारी आणि तत्सम टीप्पणी करणारी ती राजकीय सभा नक्कीच नव्हती. अक्षय यांचे रक्त तरुण आहे. नवखे असले तरी आता आमदार झालो आहोत आणि सामाजिक भान आपण जपलेच पाहिजे याची जाणिव त्यांनी ठेवण्याची गरज आहे.
अघटित शिजत असल्याचा अंदाज आला अन् सुदर्शन यांनी स्ट्रॅटेजी आखली!
गंभीर मारहाणीमुळे धीरज घटनास्थळीच गंभीर अवस्थेत कोसळला होता. त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याआधी पोलिसांनी आधी शहरात आपल्या यंत्रणेकडून काहीतरी अघटीत शिजतय याचा अंदाज घेतला. पोलिसांची खबर पक्की होती. काहीतरी वेगळच घडवण्याचा बेत काहींनी आखला होता. हा डाव पोलिसांनी आधीच ओळखला. शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा डाव हाणून पाडायचा निश्चय पोलिसांनी केला. स्ट्रॅटेजी आखली गेली. एसआरपीएफच्या तुकड्या पाचारण केल्या गेल्या. चौका चौकात, विशेषता संवेदनशील भागांमध्ये मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांची ही मुव्हमेंट पाहून अहिल्यानगर करांना देखील काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल लागली होती.
सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या एलिमेंटला सुदर्शन यांची चपराक!
घटना घडल्यापासून अंत्यविधीपर्यंत शहरातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण होती. पण एस पी सुदर्शन यांनी ती मोठ्या कौशल्याने हाताळली. त्यांना त्यांच्या इंटेलिजन्स करून आधीच इनपुट मिळाले होते. धीरजच्या मृत्यूची अधिकृत घोषणा होण्याआधी पासूनच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्त इशारा ज्यांना द्यायला हवा तो द्यायला सुरुवात केली होती. नगरमध्ये अनेक वर्ष काही अनुचित घटना घडली नव्हती. पण काही एलिमेंट त्यामध्ये आता घुसले आहेत. ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी फिरत आहेत. त्यांनी तसं करू नये यासाठी एसपी सुदर्शन यांनी सोशल मिडियावरच वॉच ठेवला. अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. त्यात हौसेेनवसे यू ट्यूब चॅनलसुद्ध सोडले गेले नाही. यातून एसपी सुदर्शन यांना कोणत्या एलिमेंटकडे अंगुली निर्देश करायचा होता हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
एसपी साहेब, गुन्हेगारांना कोणाकडून पोसलं जातंय?
पोलिसांशी हात मिळवणी आणि राजकीय वरदहस्ता शिवाय गुन्हेगारी फोपावत नसते. गुन्हेगारीसाठी वेगळ्या प्रकारच टॅलेंट मटेरियल असावं लागतं. राजकीय शक्ती आपला स्वार्थ साधण्यासाठी अशा मटेरियलच्या कायम शोधात असतात. जिल्ह्याचे एसपी कितीही खमके असले तरी त्यांना खालच्या पोलीस यंत्रणेवर अवलंबून राहून काम कराव लागत असतं. या यंत्रणेला राजकीय सिस्टीमशी विशेष नात ठेवून आपला अर्थपूर्ण स्वार्थ साधायचा असतो. यातून तयार होणाऱ्या सिस्टीम कडूनच अवैध धंद्यांना, गुन्हेगारांना पोसलं जातं. मागील सुमारे पंधरा वर्षांमध्ये राजकीय वरद हस्तातून पोसली जाणारी गुन्हेगारी फोपावताना पाहायला मिळत आहे. ती आता शहराच्या प्रगतीतील अडथळा ठरू पाहते आहे.
उत्स्फूर्त बंदचे स्वागत मात्र जबरदस्ती चुकीची!
धीरजच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करून घेत धीरजला श्रद्धांजली वाहिली. उस्फूर्त बंदच नक्कीच स्वागत केलं पाहिजे. पण बाजारपेठेसह शहराच्या अनेक भागांमध्ये युवकांचे जथ्थेच्या जथ्थे जबरदस्तीने दुकान बंद करण्यासाठी दबाव टाकत असल्याच काही ठिकाणी पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशीही बाजारपेठ, एमआयडीसी, शाळा बंद होत्या. जनजीवन यामुळे विस्कळीत झालं होतं. धीरजच्या मारेकऱ्यांना फाशी हीच त्याला खरी श्रद्धांजली असणार आहे. मात्र, बेमुदत बंद पुकारून शहराला वेठीस धरणे योग्य नक्कीच नव्हतं.
विखे पाटलांकडून हॉस्पिटलमध्ये जाऊन धीरजची विचारपूस
काही दिवसांपूर्वी राहत्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. भाजाप प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांची या मोर्चाच्या भाषणातील फटकेबाजी धर्मनिरपेक्षतेच्या लाईनवर असल्याचं पाहायला मिळालं. पालकमंत्री विखेंनी धीरजची रुग्णालयाला भेट देऊन हेल्थ अपडेट घेतली. कुटुंबियाची विचारपूस केली. आ. संग्राम जगताप आणि आ. अक्षय कर्डिले यांच्या हाकेला साथ देऊन गोपीचंद पडळकर, भंडारे अहिल्यानगर मध्ये पोहोचले. पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोनवरून संवादही घडवून आणला. मात्र विखे पाटील पिता पुत्रांची एसपी ऑफीस चौकासमोरच्या सभेला असणारी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.
कामगार युनियन आरोपीच्या पिंजऱ्यात!
कामगार युनियनने मकुंदनगर व परिसरावर नागरी सेवाबहिष्कार घालण्याचा निर्णय कोणत्या अधिकाराखाली घेतला आणि प्रत्यक्ष सेवाबहिष्कारासाठी कोण जबाबदार होते, याची स्वतंत्र चौकशी होण्याची गरज आहे. कामबंद आंदोलनासाठी सक्षम परवानगी घेतली होती का, अत्यावश्यक सेवा जाणीवपूर्वक बंद करण्यात आल्या का आणि कर्मचाऱ्यांवर आंदोलनात सहभागी होण्याची सक्ती करण्यात आली होती का यासह अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
सत्ताधाऱ्यांकडूनच गृह विभागाचे वाभाडे
धीरजच्या हत्या प्रकरणाला पाकिस्तान फिलिस्तान कनेक्शन असल्याचा आरोप झाला. ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी या प्रकरणात केंद्रीय गृह विभागात कडून सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. खरेतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लागलीच तर पाकीस्तान- फिलीस्तान कनेक्शनचा आरोप करणाऱ्यांची साक्ष नोंदवण्याची वेळ आली तर त्याचे पुरावे ते देऊ शकणार आहेत का? खरेतर विरोधकांकडून हा आरोप होण्याऐवजी तो सत्तेतल्याच नेत्यांकडून केला गेला असल्यामुळे हा सरकारला घरचा आहेर म्हणावा लागेल.
गाठायचं होतं ओंकारला, पण सापडला धीरज!
धीरजच्या मारेकऱ्यांना खरंतर माळीवाडा येथील ओंकार घोलप याला गाठायचं होतं. यापूर्वी अवैध धंद्यांच्या कारणातून बालिकाश्रम रोड वर रात्रीच्या अंधारात रस्त्यावर नंग्या तलवारी नाचवत गामा भागानगरेची हत्या करण्यात आली होती. त्याही वेळी ओंकार कनेक्शन समोर आलं होतं. पण त्यावेळी गेम झाला गामा भागानगरे याचा!
मनपा हद्दीतून वगळण्याची नियमबाह्य मागणी!
महानगरपालिकेची विशेष सभा बोलावून मुकुंदनगर, फकीरवाडा व दर्गादायरा परिसर कायमस्वरूपी वगळण्याचा ठराव मंजूर करण्याची युनियनची मागणी वैधानिक अधिकाराबाहेरील, भेदभावपूर्ण व असंवैधानिक आहे. याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतला. तेथे काम करताना त्रास होत असेल तर त्या अनुषंगाने तत्सम मागणी करण्याऐवजी हा भागच वगळा अशी मागणी करणे अत्यंत चुकीचे!
ओमकार घोलप, धीरज परदेशी व अन्य तिघांवर झाला होता 2023 मध्ये गुन्हा दाखल!
कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत जीया ताहीर शेख याच्या मटनाच्या दुकानावर दि. 24 एप्रिल 2023 मध्ये हल्ला झाला होता. यामध्ये आरोपी म्हणून शिवम प्रकाश घोलप, ओमकार रमेश घोलप, धीरज कचरुसिंग राजपूत/ परदेशी, केशव पांडुरंग मोकाटे, सागर बाळू आहेर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यात जीया शेख हा गंभीर जखमी झाला होता. त्यात भादवि 307 सह 12 गंभीर कलमानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात 402/2023 या सीआर क्रमांकाने गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांनी त्यावेळी सेशन कोर्टासमोर जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज ॲडीशनल सेशन जज प्रशांत सित्रे यांनी दि. 16 सप्टेंबर 2023 रोजीच्या आदेशाने फेटाळून लावत आरोपींचा जामिन अर्ज नाकारला होता.
प्रकरणाला वैयक्तिक वादाची जुनी किनार!
काही महिन्यांपूर्वी धीरज परदेशी, त्याचा मित्र ओंकार घोलप आणि आरोपी यांच्या वादावादी झाली होती. ती वादावादी लव जिहाद प्रकरणातील होती अशी चर्चा असतानाच अवैध धंद्यातील वादाची किनार देखील समोर आली आहे. त्यावेळी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्ताकिम अस्लम सय्यद यांना धीरज आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली होती. कोतवाली पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील दाखल झाला होता. थातूरमातूर कलमांनी फिर्याद नोंदवली गेली. पोलिसांच्या दप्तरी न्याय मिळाला नाही. मात्र, धीरजचा काटा काढण्याची संधी शोधत आताच्या आरोपींनी त्याला मुकुंदनगर परिसरात गाठले आणि त्याचा जीव घेतला.
अनिल भैय्यांची उणीव अनेकांना जाणवली!
शहरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेऊन स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी काम केलं. आज जर ते हयात असते तर ते नक्कीच रस्त्यावर उतरले असते. अनेकांनी त्यांची उणीव बोलून दाखवली. पण त्यांचा उत्तराधिकारी असणाऱ्या आणि शिंदे सेनेत असणाऱ्या विक्रम राठोड यांची या संपूर्ण प्रकरणात कोणतीच भूमिका दिसली नाही. आ. संग्राम जगताप यांचे एसपी ऑफिस चौकात भाषण सुरू असताना विक्रम राठोड यांनी आ. जगताप यांचे ते भाषण फेसबुक लाईव्ह केलं आणि ते नगरकरांनी याची देही याची डोळा पाहिले







