
राहुरी तालुका प्रतिनिधी – प्रविण पाळंदे
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात परमपूज्य आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांची १२७वी जयंती भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जैन स्थानक कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जयंतीनिमित्त आज परिसरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आचार्यश्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जैन समाजासह परिसरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या पवित्र दिनाचे औचित्य साधून धार्मिक वातावरणात जयंती उत्सव साजरा करण्यात येत असून, महाप्रसादाच्या माध्यमातून सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन बंधुभाव आणि सामाजिक एकोपा जोपासावा, असा संदेश देण्यात येत आहे.
महाप्रसादासाठी परिसरातील नागरिक, भाविक आणि जैन समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन स्थानक कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
जयंती उत्सवानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन स्थानक कमिटीचे पदाधिकारी, सदस्य तसेच कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







