
अहिल्यानगर |प्रशांत बाफना
अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि त्यांच्या भरारी पथकाच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काल रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास एका शेतकऱ्याच्या शेतीमालाने भरलेल्या वाहनाला अडवून, नियमापेक्षा जास्त वजन असल्याचे कारण देत तब्बल ३४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेचा व्हिडिओ जागरूक व निर्भीड पत्रकार शंनो पठाण यांनी सोशल मीडियावर लाईव्ह प्रसारित केला. हा व्हिडिओ अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्याखाली नागरिकांनी केलेल्या प्रतिक्रिया पाहता RTO भरारी पथकाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात दिवस-रात्र बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. चोरीचा रेशनिंग माल, भंगार, वाळू, मुरूम, गौण खनिज, सिमेंट, स्टील, कोळसा आणि इतर मालाची अवैध वाहतूक करणारी वाहने सर्रास फिरताना दिसतात. मग या वाहनांवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या वाहनांवरच कारवाई करण्याचा अट्टहास का?
भरारी पथकाने एका शेतकऱ्याच्या वाहनावर कारवाई करून नेमका कोणता मोठा पराक्रम गाजवला? दुष्काळामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, उत्पादन खर्च वाढला आहे, अशा परिस्थितीत त्याच्यावर हजारो रुपयांचा दंड लादून प्रशासनाला नेमके काय साध्य करायचे आहे?
भरारी पथकाला बेकायदेशीर वाहतूक करणारी मोठी वाहने दिसत नाहीत का? की त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते? हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. याचे स्पष्ट उत्तर RTO प्रशासनाने जनतेसमोर द्यावे.
गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर, जनावरांच्या वाहतुकीवर आणि शेतीसंदर्भातील वाहनांवरच जास्त कारवाया होत असल्याची भावना नागरिकांमध्ये बळावत आहे. प्रशासनाने कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वांना समान न्याय द्यावा. बेकायदेशीर वाहतुकीवर कठोर कारवाई व्हावी, मात्र कष्टकरी शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याचीही तितकीच काळजी घेतली पाहिजे.
अहिल्यानगर RTO प्रशासनाने या प्रकरणाची सविस्तर माहिती जाहीर करून संबंधित कारवाईचे कारण स्पष्ट करावे, तसेच जिल्ह्यातील अवैध वाहतुकीविरोधात आतापर्यंत किती कारवाया केल्या याचाही खुलासा करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे







