
भाटखेडा, ता. रावेर | प्रतिनिधी – उमेश तायडे
भाटखेडा येथे बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी उर्दू दिनदर्शिकेतील १२ रबीउल अव्वलनिमित्त जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील सर्व तडवी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सकाळी ८ वाजता भाटखेडा येथील जामा मशीद येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मदरशातील मुला-मुलींनी नात-ए-शरीफचे पठण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर बुंदीवर फातेहा देण्यात आली आणि उपस्थितांना बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
यानंतर चाँदशाह दर्ग्याजवळ गावातील तडवी बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. हातात झेंडे घेऊन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दुपारी १२ वाजता जामा मशीद येथे नियाज व लंगराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील तडवी बांधव तसेच महिला-भगिनींना भोजन देण्यात आले.
संध्याकाळी ७ वाजता मगरीबच्या नमाजीनंतर बारावफातची नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व तडवी बांधवांना बासुंदीचे वाटप करण्यात आले.
भाटखेडा या छोट्या आदिवासी गावात ईद-ए-मिलादुन्नबीचा हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात आणि एकोप्याच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पंच कमिटी तसेच गावातील नागरिकांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला पंच कमिटीचे अध्यक्ष दिलीप तडवी, सुलेमान तडवी, शाहमद तडवी, अल्ताफ तडवी, तसेच मो. अंकरम साहेब, नशीर वस्ताद, गुलशेर तडवी, रफिक मेंबर, रमजान तडवी, सलीम तडवी, इदबार वस्ताद, अकबर तडवी, नजीर तडवी यांच्यासह भाटखेडा गावातील सर्व तडवी बांधव उपस्थित होते.
गावातील सर्व समाजबांधवांच्या सहभागामुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम आनंदी, उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.







